Ambedkar Jayanti 2021 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३०वी जयंती..

शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती,
शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा 
हा नारा मुखी,

राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा !
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री , भारतीय संविधानाचे जनक ,दिन दलितांच्या जीवनाला जडलेल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा महायोद्धा , उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वतेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानवाला आज दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी १३०व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारतातच नाही तर अख्या जगात गौरवानेे घेेेतले जाते, अशा या महामानवाची आज १३०वी जयंती.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
 
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमध्ये विद्यापीठातून घेतले.नंतर ते मायदेशी परतले आणि त्यांनी

 

आपल्या बांधवांना शिका , संघटित व्हा , आणि संघर्ष करा हा संदेश दिला .

 

दीनदलित समाज्याच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शन आहे.भ्रष्टाचार,अनीती,अत्याचार,अन्यायाला त्यांचा प्रखर विरोध होता .
जातीभेदाच्या ते विरोधात होते ,जातीभेद ही समाजाला लागलेली कीड ते मानत असे ही कीड काढल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते मानत असे .शिकल्याशिवाय आपल्या वरील न्याय-अन्याय , आपले हक्क ही आपल्याला काळत नाही अशाप्रकारे त्यांनी क्रांती चे हे रणशिंग समाजात फुंकले.भीमराव नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली.त्यानी मनुष्य मात्राची जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पुरे ज्ञान , माहिती व बळ लावले आणि रंजल्या-गांजलेल्या जनतेच्या तसेच स्री वर्ग,शेतकरी,मजूरांच्या उद्धार व्हावा म्हणून आपले प्राण पणाला लावले.भीमराव यांनी सामाजिक भेदभाव व उच्च-नीच भेदभावांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले.
नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला तसेच महाडच्या चवदार तळ्यावर दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला .समाजाने धिक्कारलेल्या समाजसाठी ते  आशेचा किरण ठरले.
मूकनायक हे पाक्षिक व बहिकृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाजप्रबोधन केले.

स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला .स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. 

दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला.

अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. 
अशा या महामानवाने ६ डिसेंबर १९५६ साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post